Monday, September 14, 2020

ऊब....

 आई बाबा, बहीण, शाळा, मित्र मैत्रिणी....मग कॉलेज लाईफ सुरू होतं. एक एक टप्पा पार करत करत पुढे जाणं छान चालू असतं. मग नोकरी सुरू होते, आत्मविश्वास आणि स्वाभिमान अधिक बळावतो. मग चर्चा सुरू होते लग्नाची. आपला जोडीदार आपल्या आयुष्यात येतो. त्याचं घर , माणसं आपली होऊन जातात. आणि मग चाहूल लागते नवीन जीवाची. 

अख्खं घर आनंदून जातं. आई बाबा होणार ही कल्पना मेंदूत उतरत असते. पण बहुदा घुसलेली नसते. 

ह्या सगळ्या मध्ये होणारे आई बाबा, मावशी, अत्या, आजोबा ह्यांचा आनंद वेगळा असतो. बहुदा भविष्याची स्वप्न सुद्धा बघायला सुरुवात झालेली असते. पण ह्या सगळ्यात शांत असते ती एकच व्यक्ती "आजी". तिचाही आनंद गगनात मावत नसतो. पण तरी हे character (नाटकातील एक पात्र असं वाचावे) शांत असतं. होणाऱ्या बाळाच्या बाबाची आई आणि होणाऱ्या बाळाच्या आईची आई दोन्ही आज्याच. दोघींचं प्रेम ही तसच. पण बाळाच्या आईच्या आईचा विषय थोडा वेगळा असतो, कारण तिच्या जीवात आणिक एक इवलासा जीव वाढत असतो. 

ह्या वर्षीची तर बातच वेगळी. लॉकडाऊन हा तर त्या नऊ महिन्यांचा एक भाग जणू. पण तरी ह्या गोष्टीचा बलंतपणावर कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून तयारी सुरूच असते, मुलीला चौथा पाचवा लागला कीच. मग ओवा, शेपा, वेखंड, वावडिंग, डिंका पासून सुरू होणारी गाडी, झबली, तोपडी, दुपटी, लंगोट पासून ते खोल्या अवरणे, शाली चादरी स्वच्छ करणे, सामान भरणे आणि इत्यादी. घरातली मोठ्ठी आजी, वाहिनी, मैत्रिणी अशा जाणकारांना फोन सुरू होतात, चर्चा होतात. आणि तयारी जमेल तशी सुरू होते. 

पण तेवढ्यात ह्या वर्षी कोरोना ने अधिकच एक तुरा चढवला. दुकाने बंद, विकत काही आणायची मनात हुरहूर, रांगेत उभराहून सामान आणणे अशा सगळ्या घटना ह्या वर्षी घडल्या. माणूस बाळंतपणाच्या आधीच घरातली सगळी कामं करून अर्धा झालेला. 

पण तरी कमी काही पडायला नको हे एकच मनात पक्कं. मग सासरी असेल तर पूर्वी एखादी लहान बहीण म्हणजेच आत्या हे पात्र नाटकात प्रवेश करत. आणि माहेरी असते ती मावशी. चौघड्या असतात, ओढण्या असतात, अशातून दुपटी तयार होतात. पण पूर्वी आजी साडी नेसणारी होती आता ड्रेस घालणारी आहे. मग त्या मऊ कॉटोन चे ड्रेस छा वापर होतो आणि मऊ दुपटी तयार होतात. बाळाला मऊ मऊ कपडे हवेत हीच भावना मनात ठेऊन तयारी होते, बॅग भरली जाते. 

आई बाबा, मावशी , मावश्या इतर सगळे ह्यांना बाळाचं कौतुक अस्तच पण धावणारी असते ती आजीच. तिला बाळ सुंदर दिसतेय की कुरूप ह्याचं घेणं देणं नसतं, तिला असते ती फक्त काळजी. त्याची तब्येत, तिच्या मुलीची / सुनेची तब्येत, सर्दी, खोकला, पोट सगळं नीट राहणं एवढंच विश्व. कारण आजी हे पात्रच असं असतं. उद्या कोनिकाहीही म्हणू देत, माझं बाळ नीट राहायला हवं एवढीच त्या मागील धारणा. तिला आपली नात अथवा नातू पुढे काय शिकेल, कुठे जाईल हे चित्र जणू आत्ता दिसतच नसतं, तिला फक्त काळजी असते ती आत्ताची आणि प्रत्येक स्पर्शात असते ती ऊब आणि माया. ते म्हणतात ते चुकीचं नाही "आजोबांनी खेळायच आणि आजीने भरवायच". 

ह्या सगळ्यात त्या नवीन नुकत्याच झालेल्या आईला स्वतःच्या आई बद्दल कौतुक आणि आदर वाटतोच पण आजीची अधिक आठवण येऊन डोळे पणावून जातात. 

कारण अजूनही तिच्याकडे ती मऊ चौघडी, मऊ ओढणी असते जी तिला ऊब देऊन जाते, जी महागड्या पांघरुणात तिला भावत नाही. कारण त्या मध्ये प्रेम, माया, आणि ऊब नसते.  

No comments:

Post a Comment