Wednesday, February 24, 2021

मेजवानी आणि निसर्ग....

 परवा दीक्षित काकूंनी लिहिलेला लेख वाचला....आणि खरंच अशी मेजवानी घडली की काय सांगू ! आणि मला सगळं मस्त काय काय आठवलं. उत्तम अन्न शिजवणे ही सगळ्यात अवघड कला आहे. कारण कैक वर्ष तोच पदार्थ कुठलंही प्रमाण न लक्षात ठेवता तसाच्या तसा बनवणं, ही अजिबातच सोप्पी गोष्ट नाही. आणि असा एक नाही विविध चवीचे, विविध रंगाचे अनेक पदार्थ. स्वयंपाकाची बहुदा पहिली ओळख करून दिली जाते ती आईमुळेच. सगळं खायला हवं, ताटात वाढलेलं सगळं संपवायचं, लागेल तेवढंच मागावं पण टाकू नये, ही लहानपणापासून दिलेली शिकवण. त्यामुळे कुठला पदार्थ कसा लागतो, अगदी कणीदार तूप, खडबडीत साखर, मऊ पांढरं शुभ्र लोणी ह्या अगदी basic गोष्टी सुद्धा आईनेच दाखवल्या. आणि त्याला अजून कळस चढवला तो आजांनी. 

आईची आई आणि बाबांची आई, दोघी उत्तम सुगरणी. बाबांच्या आईला आम्ही मामी आजी म्हणायचो, तिच्या तर म्हणजे हातालाच चव. छोटी साबुदाण्याची थालिपीठं, भाजणीचे थालिपीठ, उपिट, सांज्याच्या पोळ्या, उकड, बटाट्याचा कीस, साबुदाणा खिचडी, गुळाच्या पोळ्या, इथपासून ते अगदी उत्तम ताका पर्यंत सगळेच पदार्थ झकास. 

आणि परिंच्याची आजी म्हणजे त्या मागची सगळी करणं सांगून गोष्ट सांगणारी. खास उन्हाळ्याच्या सुट्टीत अत्यंत कष्टाचं असं काम म्हणजे चिकाच्या कुरडया. त्याचा घमघमाट असा वाड्याभर पसरायचा, अहाहा. चिक हुंगणे, रंग बदलणे, उत्तम कुरडया पाडणे. त्या चिकावर उत्तम आडवा हाथ मारणे. आजीची गरम हिरवीगार भेंडीची भाजी, भरल्या वांग्याची भाजी, टम्म फुगलेली भाकरी, पुरणाची पोळी, कटाची आमटी, विविध अमट्या, पातळ पालेभाजी. आणि शाळा, शेत हे सगळं सांभाळून. 

प्रत्येक भाजीची वेगळी चव, वेगळा वास, वेगळा रंग, हाताला वेगळा स्पर्श. किती विविधता आहे खरंच निसर्गात आणि तशीच वाढलेल्या पानात. पांढरं मीठ, पिवळी लिंबाची फोड, हिरवी चटणी, तळलेल्या कुरडया त्यातही विविधता, पिवळी बटाट्याची भाजी, पांढरा भात त्यावर सुंदर पिवळं वरण आणि त्यावर कणीदार तुपाची धार, आमटीचा विविध रंग, ताक. विविध पालेभाज्यांची, फळभाज्यांची, चटण्यांची तराच वेगळी. 

निसर्ग जितकं देतो ते थोडं. पण माणूस सध्या ह्या सगळ्या पेक्षा पैसा किती श्रेष्ठ आहे असा वागू लागला. निसर्गाला पैशाने नमवू पाहू लागला. हे दिसलं की काळीज तुटतं. ताटात वाढलेल्या गोष्टीचा अपमान कोणी केला की काळीज तुटतं. आणि मग "हे नको का थांब हे खा" की अजून तुटतं. निसर्ग ह्या देवाला ज्याने मानले त्याला हे करणं कधी जमणारच नाही. पण हे कसं समजवावे आणि कोणाला समजवावे. लहापणापासूनच आम्हाला एकच शिकवलं घरी, शाळेत सगळीकडे वाढलेल्या अन्नाचा कधी अपमान करू नये. आणि त्या आपल्याला जपणाऱ्या निसर्गाचा सुद्धा. 


- ऋचा

Tuesday, February 16, 2021

सडा.....

 मारव्याचा गंध पसरला होता मनात

रातराणी बहरली माझ्या अंगणात

मोगरा पण कसा अगदी टपोरा.... फुलून बसला होता

आणि बाजूला मल्हारचा सुर होता घुमत


सोनचाफा मंद सुवास देत होता.... अगदी शांत...  

आणि तेवढ्यात, गुलाबाचा काटा बोचला हळूच बोटात

आणि इतक्यातच प्राजक्त पडला नाजुकसा हळूच ओंझळीत

आणि काट्याच सलण क्षणात हरवलं ओंझळीत


मालकंस ऐकू आला लांबून कुठेतरी

नदीचा संथ प्रवाह पैलतिरी

चांदणी लुकलुकत होती आसमंती

आणि चंद्राचा प्रकाश गगनी


तो काटा रुतला कधी ? दुखणं देऊन गेला कधी....

त्या टपोऱ्या फुलाच्या मोहक रूपात हरवले सुद्धा सारे

अगदी....हलकेच कोणीतरी मोरपीस फिरवावे तसे

आठवणींच्या सुंदर शृंखलेत गुरफटले गेले जसे


मोहक फुलं दरवळत आहेत

चंद्र आसमंती स्थिरावला आहे

रागाचे विलोभनीय सुर कानी गुंजन करत आहेत...

आणि आठवणींचा सडा बहरतच चाललाय......

Sunday, January 24, 2021

तो आणि ती

आज एक पहिलाच अशी कविता लिहायचं प्रयत्न 😀


तो म्हणाला तिला का ग नाही बोलत

ती मनातच म्हणाली मी नाही अबोला धरत

मनातच म्हणाला मग बघत नाहीस डोळ्यात

तिने डोळ्यातलं पाणी लपवत काहीच दिलं नाही उत्तर

मन गलबलून गेलं, बोल काही येईना

बोट चोरुन हळूच मन जरा हलून गेलं

वाट कुठेतरी हरवली का ग

त्याने डोळ्यातून विचारलं

तिने टपोऱ्या डोळ्यातलं पाणी लपवत आज त्याच्याकडे पाहिलं

वाट कुठे माहित नाही.... चालत होते शांत

अशाच एका वाटेवर हात आला हातात

छान होती सोबत, छान होता प्रवास

भारावून गेले तुझ्यात, बुडाले अखंड प्रेमात

तुझीच मी होऊन, स्वतःलाच विसरून गेले मनात

वाटे मनी मला...तूही माझ्यातच गुंतलास

माझ्याच प्रेमात, स्पर्शात अखंड बुडलास

स्वप्नांचे मनोरे रचीत गेले, मनातले सारे सांगत गेले

काल, आज, उद्या मध्ये फक्त तुलाच बसवत गेले

पण मग हळूच शृंखला उमगली, कळी हळू - हळू खुलत गेली

त्याच्या मनात ती बहुदा कधी विसावलीच नाही

हे ही म्हणा तिच्याच मनाचे खेळ

पण त्याने ही दुजोरा दिला नाही कशालाच

खेळ सुरूच होता, मनाच्या, डोळ्यांच्या लपाछपीचा 

उत्तरं शोधत सत्र सुरू राहिलं खास

तिने मनात म्हणलं, वर्ष किती सरले, किती उरले माहित नाही

पण ह्याच्या सारखा सोबती दुसरा होणे नाही

त्याला काय उमगले तिला कळालेच नाही

कोरडे शुष्क डोळे खुप काही बोलले

चुकले का काही म्हणून ही शांतता आली

की चुकाच फक्त दिसत गेल्या, गुण बाजूला राही

विचार केला हळूच आणि तिने डोळ्यात पाहिले

सगळे भाव एकवटून आले

वर्ष गेले सरून, मन गहिवरले

मेघांनी कंठ दाटून आला जेव्हा

नभ उतरू आलं तिच्या अंगणी तेव्हा


- ऋचा