Thursday, September 13, 2018

गणपती बाप्पा मोरया !!


लहानपणा पासून प्रत्येकालाजय बाप्पा करा, हि शिकवण बहुदा आई काही दिवसातच द्यायला सुरुवात करते. अर्थात देव देव करण्या साठी नाही पण कुठे तरी माणसाची श्रद्धा असावी म्हणून. आणि अर्थात त्याच श्रद्धेमुळे माणूस, नतमस्तक व्हायला शिकतो, कोणा समोर तरी आहे नाही तो सगळा अहंकार बाजूला सारून, नुसता शरीराने नाही तर मनापासून झुकायला शिकतो. त्यामुळे बाप्पा जय ची सुरुवात हळूच होते नकळत. मग त्या लहान पोराला, कुठलाही बाप्पा सांगितला तरी तो त्याला भावतो, कारण  मनात  कुठलाच चेहरा, मूर्ती  ठसलेली  नसते.

पण सगळ्यांचाच लहानपणा पासून लाडका बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा. काय कोणास ठाऊक, पण गणपती येणार म्हणलं कि असा चैतन्य पसरतं. हवेत एक प्रकारची नशा येते. म्हणजे असा छोटासा उंदीर, मोदक, जास्वदींचं फुल, दुर्वा. आणि आई वडिलांवर श्रद्धा आणि प्रेम. ह्या सगळ्या गोष्टी ऐकत  ऐकत  आपला  बालपण  सरतं.

लहान असताना, गणपती म्हणजे पुणे असा समीकरण डोक्यात होतं. पण मग हळू हळू, शाळा, सुट्ट्या ह्यांचं गणित बसेनास झालं आणि आम्ही रसायनी मध्येच छोटासा गणपती बसवायला  लागलो. मी जाणीव पूर्वक छोटासा म्हणाले. म्हणजे मूर्ती आणायला गेल्यावर plaster of paris च्या मूर्ती बघितल्या आणि नको वाटलं. भव्य मूर्ती, उभ्या, आणि प्रसन्न नाही वाटलं. आजकाल तर म्हणजे घरात सुद्धा भल्या मोट्ठ्या मूर्ती  दिसतात, ज्या  पूर्वी  फक्त  मंडळात  दिसायच्या. असो हा विषय वेगळा आहे.

तर त्या मूर्ती बघून घरी आल्यावर, काही मनापासून आवडल्या नाहीत. आणि मग अचानक कल्पना आली आपणच केली तर. साधारण 2001-2002 ची गोष्ट. थोडीशी पर्व कल्पना:

आम्ही colony मध्ये राहायचो. Colony म्हणजे एक सुरेख छोटंसं गाव, शहर. ज्यात खरंच जात, पात, धर्म ह्यांचा कुठलाही लवलेश कधी जडला नाही. कारण देशातल्या विविध भागातून आलेले लोक. त्यामुळे  तिथे  गणपती, दसरा, अय्यप्पा, ओणम, क्रिसमस, ईद असे सगळे सण साजरे  व्हायचे. आमचे आधीचे शेजारी मुस्लिम आणि नंतरचे ख्रिस्ती होते.

तर असा हा गणपती, आपण घरीच तयार करावा असा विचार झाला. आणि बाजूला ख्रिस्ती मुलगा अतिशय कमाल creative artist कामाला लागला. आई, बहीण, बाबा, बाजूचा मुलगा अभय, त्याचे  वडील  (उत्तम  tips द्यायला), असे सगळे मिळून सचोटीने मूर्ती करण्यात दंग. आणि खरं सांगायचं  तर आपोआप  गणपती  आकार घ्यायचा. रंगकाम. आणि सगळ्यात छान म्हणजे त्याचे डोळे. कारण ते झाले कि असं वाटतं  खरंच  तो  आपल्याकडे  बघत  आहे  छान. आणि असा तो बाप्पा मग तयार व्हायचा.

पुढची गोष्ट असते म्हणजे त्याची सजावट. ते करायला सगळेच उत्सुक. ती करायला उत्साहाने बशीर शेख तयार. आजू बाजूला फुलं, घरात आधी आम्ही बनवलेला धबधबा. सगळं छान natural (thermocol) चा उपयोग तेव्हाही नाही). आणि आमचा बाप्पा विराजमान व्हायचा.

मुद्दाम तो विराजमान व्हायचा म्हणलं. कारण अगदी जवळचा असा बाप्पा. आणि तो हि बहुदा धन्य व्हायचा. कारण कुठल्याही धर्माचा, जातीचा, वर्णाचा नसायचा. फक्त आनंदी भावाने सद्भावनेने केलेला असायचा. आणि म्हणून बहुदा जास्त हसरा, शांत, समाधानी वाटायचा. त्याला thermocol च्या कमळात बसवावं नाही लागलं, विसर्जन केल्यावर हात -पाय -सोंड ह्यांचं विद्रुप रूप नाही झालं, माणसाने बनवलेला आणि  सजवलेला  असायचा. त्यामुळे खूप  हसरा, शांत आणि सुरेख दिसायचा.

हि शिकवण बहुदा आई, बाबा ह्यांनी नकळत रुजवली. कि सगळ्यात मोठ्ठा धर्म म्हणजे माणूस. कारण देवाने सगळे सारखेच तयार केले, त्याला आपण समान पद्धतीने नमस्कार करूयात. आज इतक्या वर्षाने, त्याच मुलाने message करून विचारलं किoffice मध्ये स्पर्धा आहे, मी गणपती बनवणार आहे, पूर्वी आपण बनवायचो तसा. आता ते करून पण 10-11 वर्ष झाली. पण नक्की येईल. काकूंना सांग, त्यांच्यामुळे तो आत्मविश्वास आला.” आणि हे लिहायला आपसूकच प्रेरणा मिळाली.

गणपती बाप्पा मोरया !!

No comments:

Post a Comment