Wednesday, February 24, 2021

मेजवानी आणि निसर्ग....

 परवा दीक्षित काकूंनी लिहिलेला लेख वाचला....आणि खरंच अशी मेजवानी घडली की काय सांगू ! आणि मला सगळं मस्त काय काय आठवलं. उत्तम अन्न शिजवणे ही सगळ्यात अवघड कला आहे. कारण कैक वर्ष तोच पदार्थ कुठलंही प्रमाण न लक्षात ठेवता तसाच्या तसा बनवणं, ही अजिबातच सोप्पी गोष्ट नाही. आणि असा एक नाही विविध चवीचे, विविध रंगाचे अनेक पदार्थ. स्वयंपाकाची बहुदा पहिली ओळख करून दिली जाते ती आईमुळेच. सगळं खायला हवं, ताटात वाढलेलं सगळं संपवायचं, लागेल तेवढंच मागावं पण टाकू नये, ही लहानपणापासून दिलेली शिकवण. त्यामुळे कुठला पदार्थ कसा लागतो, अगदी कणीदार तूप, खडबडीत साखर, मऊ पांढरं शुभ्र लोणी ह्या अगदी basic गोष्टी सुद्धा आईनेच दाखवल्या. आणि त्याला अजून कळस चढवला तो आजांनी. 

आईची आई आणि बाबांची आई, दोघी उत्तम सुगरणी. बाबांच्या आईला आम्ही मामी आजी म्हणायचो, तिच्या तर म्हणजे हातालाच चव. छोटी साबुदाण्याची थालिपीठं, भाजणीचे थालिपीठ, उपिट, सांज्याच्या पोळ्या, उकड, बटाट्याचा कीस, साबुदाणा खिचडी, गुळाच्या पोळ्या, इथपासून ते अगदी उत्तम ताका पर्यंत सगळेच पदार्थ झकास. 

आणि परिंच्याची आजी म्हणजे त्या मागची सगळी करणं सांगून गोष्ट सांगणारी. खास उन्हाळ्याच्या सुट्टीत अत्यंत कष्टाचं असं काम म्हणजे चिकाच्या कुरडया. त्याचा घमघमाट असा वाड्याभर पसरायचा, अहाहा. चिक हुंगणे, रंग बदलणे, उत्तम कुरडया पाडणे. त्या चिकावर उत्तम आडवा हाथ मारणे. आजीची गरम हिरवीगार भेंडीची भाजी, भरल्या वांग्याची भाजी, टम्म फुगलेली भाकरी, पुरणाची पोळी, कटाची आमटी, विविध अमट्या, पातळ पालेभाजी. आणि शाळा, शेत हे सगळं सांभाळून. 

प्रत्येक भाजीची वेगळी चव, वेगळा वास, वेगळा रंग, हाताला वेगळा स्पर्श. किती विविधता आहे खरंच निसर्गात आणि तशीच वाढलेल्या पानात. पांढरं मीठ, पिवळी लिंबाची फोड, हिरवी चटणी, तळलेल्या कुरडया त्यातही विविधता, पिवळी बटाट्याची भाजी, पांढरा भात त्यावर सुंदर पिवळं वरण आणि त्यावर कणीदार तुपाची धार, आमटीचा विविध रंग, ताक. विविध पालेभाज्यांची, फळभाज्यांची, चटण्यांची तराच वेगळी. 

निसर्ग जितकं देतो ते थोडं. पण माणूस सध्या ह्या सगळ्या पेक्षा पैसा किती श्रेष्ठ आहे असा वागू लागला. निसर्गाला पैशाने नमवू पाहू लागला. हे दिसलं की काळीज तुटतं. ताटात वाढलेल्या गोष्टीचा अपमान कोणी केला की काळीज तुटतं. आणि मग "हे नको का थांब हे खा" की अजून तुटतं. निसर्ग ह्या देवाला ज्याने मानले त्याला हे करणं कधी जमणारच नाही. पण हे कसं समजवावे आणि कोणाला समजवावे. लहापणापासूनच आम्हाला एकच शिकवलं घरी, शाळेत सगळीकडे वाढलेल्या अन्नाचा कधी अपमान करू नये. आणि त्या आपल्याला जपणाऱ्या निसर्गाचा सुद्धा. 


- ऋचा

No comments:

Post a Comment